२ शमुवेल १३:१-३९
१३ दावीदचा मुलगा अबशालोम याची एक बहीण होती. ती खूप सुंदर असून तिचं नाव तामार+ होतं. दावीदच्या मुलाचं, अम्नोनचं+ तिच्यावर प्रेम जडलं.
२ आपली बहीण तामार हिच्यामुळे तो इतका बेचैन झाला, की तो आजारी पडला. कारण, ती कुमारी होती आणि तिच्यासोबत काही करण्याची शक्यता त्याला दिसत नव्हती.
३ अम्नोनचा यहोनादाब+ नावाचा एक मित्र होता. तो दावीदचा भाऊ शिमाह+ याचा मुलगा होता. यहोनादाब हा अतिशय चतुर होता.
४ तो अम्नोनला म्हणाला: “तू राजाचा मुलगा असून इतका उदास-उदास का वाटतोस? मला सांग काय झालंय.” त्यावर अम्नोन त्याला म्हणाला: “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझं मन बसलंय.”+
५ यहोनादाब त्याला म्हणाला: “असं कर, आपल्या बिछान्यावर पडून राहा आणि आजारी असल्याचं सोंग कर. मग तुझे वडील तुला भेटायला आले की त्यांना म्हण, ‘कृपा करून माझी बहीण तामार हिला माझ्याकडे पाठवा. म्हणजे ती मला काहीतरी खायला बनवून देईल. तिने जर आजाऱ्यांना दिलं जाणारं जेवण माझ्यासमोर तयार केलं, तर मी ते तिच्या हातून खाईन.’”
६ म्हणून मग अम्नोन आजारी असल्याचं सोंग करून पडून राहिला. राजा त्याला भेटायला आला तेव्हा तो राजाला म्हणाला: “कृपा करून माझी बहीण तामार हिला माझ्याकडे पाठवा. म्हणजे ती माझ्यासमोर दोन भाकरी* तयार करून मला आपल्या हाताने भरवेल.”
७ तेव्हा दावीदने घरी तामारला असा निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी जेवण* तयार कर.”
८ म्हणून मग तामार आपला भाऊ अम्नोन याच्या घरी गेली. तो बिछान्यावर पडून होता. तिने त्याच्यासमोर पीठ घेऊन ते मळलं आणि त्यापासून भाकरी बनवल्या.
९ मग तिने त्या भाकरी एका ताटात घालून अम्नोनसमोर ठेवल्या. पण अम्नोन त्या खायला तयार झाला नाही. तो म्हणाला: “सगळ्यांना बाहेर पाठवून द्या!” म्हणून सगळे जण बाहेर गेले.
१० अम्नोन मग तामारला म्हणाला: “माझ्या झोपायच्या खोलीत जेवण घेऊन ये, म्हणजे मी ते तुझ्या हातून खाईन.” म्हणून मग तामार, तयार केलेल्या त्या भाकरी* घेऊन आपला भाऊ अम्नोन याच्या झोपायच्या खोलीत गेली.
११ तिने त्या भाकरी त्याला खायला दिल्या, तेव्हा त्याने तिला धरलं आणि तो तिला म्हणाला: “ये माझ्या बहिणी, माझ्याजवळ येऊन झोप.”
१२ पण ती त्याला म्हणाली: “नाही माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! असं कृत्य इस्राएलमध्ये घडायला नको.+ तू असलं नीच काम करू नकोस.+
१३ माझी बेअब्रू झाली तर मी कशी जगणार? आणि तुला तर इस्राएलमधल्या निर्लज्ज माणसांमध्ये गणलं जाईल. त्याऐवजी कृपा करून राजाशी बोल. माझा हात तुझ्या हातात द्यायला ते नाही म्हणणार नाहीत.”
१४ पण तो तिचं काहीएक ऐकायला तयार नव्हता. त्याने तिच्यावर जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला बेअब्रू केलं.
१५ त्यानंतर अम्नोनला तिचा भयंकर तिरस्कार वाटू लागला. तो आधी तिच्यावर जितकं प्रेम करायचा, त्यापेक्षा कितीतरी जास्त आता तो तिचा तिरस्कार करू लागला. तो तिला म्हणाला: “ऊठ, चालती हो!”
१६ तेव्हा ती त्याला म्हणाली: “नाही माझ्या भावा, असं करू नकोस. तू माझ्यासोबत जे केलं, त्यापेक्षा मला आता हाकलून देणं हे जास्त वाईट आहे!” पण तो तिचं काहीही ऐकायला तयार नव्हता.
१७ तेव्हा त्याने आपल्या एका तरुण सेवकाला बोलावून म्हटलं: “हिला माझ्या नजरेसमोरून दूर कर आणि दार बंद करून घे!”
१८ (त्या वेळी तामारने एक खास* झगा घातला होता; कारण त्या काळात राजाच्या कुमारी मुली अशीच वस्त्रं घालायच्या.) म्हणून मग अम्नोनच्या सेवकाने तिला घराबाहेर काढलं आणि दार बंद करून घेतलं.
१९ मग तामारने आपल्या डोक्यावर राख टाकली+ व अंगावरचा तो खास झगा फाडला. आणि आपल्या डोक्यावर हात ठेवून ती मोठमोठ्याने रडत निघून गेली.
२० तेव्हा तिच्या भावाने, अबशालोमने+ तिला विचारलं: “हे तुझ्यासोबत तुझ्या भावाने, अम्नोनने केलंय का? पण माझ्या बहिणी ऐक, याविषयी कोणालाही काही सांगू नकोस. तो तुझा भाऊ आहे.+ तेव्हा यावर जास्त विचार करू नकोस.” मग, तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरात एकाकी जीवन जगू लागली.
२१ दावीद राजाने हे सगळं ऐकलं तेव्हा त्याला फार राग आला.+ पण त्याला अम्नोनचं मन दुखवायचं नव्हतं. कारण तो त्याचा पहिला मुलगा होता आणि त्याच्यावर त्याचं खूप प्रेम होतं.
२२ अबशालोम अम्नोनचा द्वेष करू लागला.+ कारण त्याने त्याच्या बहिणीची, तामारची बेअब्रू केली होती.+ पण तो अम्नोनला बरंवाईट काहीच बोलला नाही.
२३ या घटनेच्या दोन वर्षांनंतर, अबशालोमने एफ्राईमजवळ+ असलेल्या बआल-हासोर इथे मेंढरांची लोकर कातरण्यासाठी माणसं बोलावली. आणि त्याने राजाच्या सर्व मुलांना आमंत्रण दिलं.+
२४ अबशालोम राजाकडे येऊन म्हणाला: “आपल्या सेवकाच्या मेंढरांच्या लोकरीची कातरणी आहे. तेव्हा राजाने आवर्जून आपल्या सर्व सेवकांसोबत यावं.”
२५ पण राजा अबशालोमला म्हणाला: “नको माझ्या मुला. आम्ही सगळेच आलो तर उगाच तुझ्यावर जास्त भार पडेल.” अबशालोमने बराच आग्रह करूनही राजा काही जायला तयार झाला नाही. पण त्याने त्याला आशीर्वाद दिला.
२६ मग अबशालोम म्हणाला: “ठीक आहे. तुम्ही येत नसाल तर निदान माझा भाऊ अम्नोन याला तरी आमच्यासोबत पाठवा.”+ त्यावर राजा म्हणाला: “त्याने तुझ्यासोबत का जावं?”
२७ पण अबशालोमने खूप आग्रह केला. त्यामुळे मग राजाने अम्नोनला आणि आपल्या सगळ्या मुलांना त्याच्यासोबत पाठवलं.
२८ मग अबशालोमने आपल्या सेवकांना अशी आज्ञा दिली: “अम्नोनवर लक्ष ठेवा. तो जेव्हा द्राक्षारस पिऊन धुंद होईल त्या वेळी मी तुम्हाला म्हणीन, ‘अम्नोनला ठार मारा!’ तेव्हा तुम्ही त्याला मारून टाका. अजिबात घाबरू नका. मी सांगतोय ना तुम्हाला? म्हणून हिंमत धरा आणि शौर्य दाखवा.”
२९ मग अबशालोमने जसं सांगितलं होतं, अगदी तसंच त्याच्या सेवकांनी अम्नोनच्या बाबतीत केलं. तेव्हा राजाची बाकीची सर्व मुलं उठली आणि आपापल्या खेचरावर बसून पळून गेली.
३० ते सर्व रस्त्यात असतानाच दावीदला अशी खबर मिळाली: “अबशालोमने राजाच्या सगळ्या मुलांना मारून टाकलंय. त्यातला एकही वाचला नाही.”
३१ ते ऐकून राजा उठला आणि दुःखाने आपले कपडे फाडून तो जमिनीवर पडून राहिला. तेव्हा त्याच्या सर्व सेवकांनीसुद्धा आपले कपडे फाडले आणि ते त्याच्याजवळ उभे राहिले.
३२ पण दावीदचा भाऊ शिमाह+ याचा मुलगा यहोनादाब+ दावीदला म्हणाला: “हे माझ्या प्रभू, असा गैरसमज करून घेऊ नका, की अबशालोमने राजाच्या सगळ्या मुलांना मारून टाकलंय; त्याने फक्त अम्नोनला ठार मारलंय.+ आणि हे सगळं अबशालोमच्या हुकमावरून झालंय.+ कारण, ज्या दिवशी अम्नोनने तामारची+ अब्रू लुटली+ त्या दिवसापासूनच त्याने असं करायचं ठरवून टाकलं होतं.
३३ तेव्हा हे माझ्या प्रभू, ‘राजाची सर्व मुलं मरण पावलीत’ या बातमीवर राजाने विश्वास ठेवू नये. कारण फक्त अम्नोन मरण पावलाय.”
३४ इकडे, अबशालोम पळून गेला.+ नंतर शहराच्या पहारेकऱ्याने समोर नजर टाकली, तेव्हा डोंगराकडच्या रस्त्याने पुष्कळसे लोक येत असल्याचं त्याला दिसलं.
३५ त्यावर यहोनादाब+ राजाला म्हणाला: “पाहा! राजाची मुलं परत आली आहेत. तुमचा हा सेवक बरोबर बोलला होता.”
३६ त्याचं बोलणं संपलं ना संपलं तोच राजाची मुलं मोठमोठ्याने रडत आत आली. त्यांच्यासोबत राजा आणि त्याचे सर्व सेवकसुद्धा खूप रडले.
३७ पण अबशालोम तलमय याच्याकडे पळून गेला;+ तलमय हा गशूरचा राजा अम्मीहूद याचा मुलगा होता. दावीदने आपला मुलगा अम्नोन याच्यासाठी बरेच दिवस शोक केला.
३८ अबशालोम गशूरला+ पळून गेल्यावर तीन वर्षं तिथेच राहिला.
३९ शेवटी, दावीद राजाला अबशालोमला भेटायची खूप ओढ लागली. कारण आतापर्यंत तो अम्नोनच्या मृत्यूच्या दुःखातून सावरला होता.
तळटीपा
^ शब्दशः “हृदयाच्या आकाराच्या भाकरी.”
^ किंवा “आजाऱ्यांसाठी असलेलं जेवण.”
^ शब्दशः “हृदयाच्या आकाराच्या भाकरी.”
^ किंवा “भरजरी.”