ख्रिस्ती जीवन
उपचारासंबंधी निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी आत्तापासूनच तयार राहा!
हे का गरजेचं आहे? आपल्याला अचानक आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची पाळी येऊ शकते. अशा वेळी सगळ्यात चांगली वैद्यकीय सेवा आपल्याला मिळावी म्हणून आपण आत्तापासूनच तयार असलं पाहिजे. त्यासाठी संघटनेने आपल्याला जे मार्गदर्शन आणि मदत पुरवली आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. असं केल्यामुळे जीवनाबद्दल आणि यहोवाने रक्ताविषयी दिलेल्या आज्ञेबद्दल आपल्या मनात आदर असल्याचं दिसून येईल.—प्रेका १५:२८, २९.
तुम्ही तयारी कशी करू शकता?
-
प्रार्थनापूर्वक विचार करून ॲडव्हान्स हेल्थकेअर डायरेक्टिव्ह (डी.पी.ए.) कार्ड a भरा. बाप्तिस्मा घेतलेले प्रचारक, साहित्याची देखरेख करणाऱ्या बांधवाकडून स्वतःसाठी डी.पी.ए कार्ड आणि आपल्या लहान मुलांसाठी आयडेंटीटी कार्ड (आय.सी.) घेऊ शकतात
-
ज्या बहिणी आई बनणार आहेत त्या मंडळीतल्या वडिलांकडून गर्भवती बहनों के लिए जानकारी (S-401) या हिंदीतल्या पत्रिकेची एक प्रत घेऊ शकतात. गर्भावस्थेच्या काळात आणि बाळाच्या जन्माच्या वेळी जर काही वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या, तर अशा वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी या पत्रिकेची तुम्हाला मदत होईल
-
जर तुम्हाला अशा एखाद्या वैद्यकीय उपचाराची गरज असेल ज्यामध्ये रक्ताचा संबंध येऊ शकतो, किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज पडणार असेल, तर तुम्ही मंडळीतल्या वडिलांना याबद्दल सांगितलं पाहिजे.
मंडळीतले वडील तुम्हाला कशी मदत करू शकतात? ते तुम्हाला तुमचं डी.पी.ए. कार्ड भरायला मदत करू शकतात. पण जिथे उपचाराबद्दल व्यक्तिगत निर्णय घेणं गरजेचं आहे अशा ठिकाणी ते तुमच्यासाठी निर्णय घेणार नाहीत किंवा स्वतःचं वैयक्तिक मत तुमच्यावर लादणार नाहीत. (रोम १४:१२; गल ६:५) जेव्हा तुम्ही वडिलांना सांगाल, की तुम्हाला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे ज्यामध्ये रक्ताविषयीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तेव्हा ते लगेच तुमच्यावतीने इस्पितळ संपर्क समितीला (HLC) सांगतील.
एच.एल.सी. समिती कशी मदत करू शकते? एच.एल.सी. समितीतल्या बांधवांना वैद्यकीय आणि न्यायिक क्षेत्रातल्या लोकांसोबत बोलण्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं. हे बांधव त्यांना रक्ताविषयी असलेल्या आपल्या धार्मिक विश्वासाबद्दल सांगू शकतात. ते तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत अशा वैद्यकीय उपचार पद्धतींबद्दल बोलू शकतात ज्यात रक्ताचा वापर केला जात नाही. आणि गरज असेल तर ते तुम्हाला अशा डॉक्टरांना शोधायला मदत करतील जे रक्ताचा वापर न करता उपचार करायला तयार असतात.
रक्ताचा वापर करणाऱ्या वैद्यकीय उपचारांसंबंधी निर्णय कसे घ्यावेत?, हा व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या:
-
रक्ताविषयी प्रश्न निर्माण होईल अशी एखादी परिस्थिती तुमच्यासमोर आली, तर त्यासाठी आधीच तयारी कशी करायची याबद्दल या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
a उपचारादरम्यान रक्ताचा वापर करण्याविषयी प्रश्न निर्माण होतो तेव्हा योग्य निर्णय कसे घेता येतील याबद्दल कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातल्या ३९ व्या धड्यात जास्त माहिती देण्यात आली आहे.