ख्रिस्ती जीवन
जगाच्या अंताच्या वेळी आपला बचाव होईल अशी खातरी बाळगा
आजपर्यंत यहोवाने या जगातल्या लोकांना सहन केलंय. पण आता लवकरच त्याचा धीर संपेल. खोट्या धर्मांचा नाश होईल, राष्ट्रांचा समूह देवाच्या लोकांवर हल्ला करेल आणि हर्मगिदोनात यहोवा दुष्ट लोकांचा नाश करेल. या सगळ्या रोमांचक आणि महत्त्वाच्या घटनांची आपण वाट पाहत आहोत.
मोठ्या संकटादरम्यान काय-काय होईल याबद्दल बारीकसारीक गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. उदाहरणार्थ, मोठं संकट नेमकं कधी सुरू होईल, राजकीय सत्ता खोट्या धर्मांवर हल्ला करण्यासाठी कोणती कारणं पुढे करतील आणि देवाच्या लोकांवर राष्ट्रांचा हल्ला किती काळ चालेल आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी सामील असतील हे आपल्याला माहीत नाही. हर्मगिदोनात दुष्टांचा नाश करण्यासाठी यहोवा नेमक्या कोणत्या गोष्टींचा वापर करेल हेसुद्धा आपल्याला माहीत नाही.
पण भविष्यात होणाऱ्या या गोष्टींचा आत्मविश्वासाने आणि धैर्याने सामना करण्यासाठी आपल्याला लागणारी सगळी माहिती शास्त्रवचनांमध्ये दिली आहे. उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे, की आपण “शेवटच्या दिवसांत” जगत आहोत. (२ती ३:१) आपल्याला हेही माहीत आहे की खऱ्या धर्माचा नाश होऊ नये म्हणून खोट्या धर्मावर होणाऱ्या हल्ल्याचे दिवस ‘कमी करण्यात येतील.’ (मत्त २४:२२) आणि यहोवा त्याच्या लोकांचं नक्की संरक्षण करेल. (२पेत्र २:९) तसंच आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आणि मोठ्या लोकसमुदायाला हर्मगिदोनातून वाचवण्यासाठी यहोवाने ज्याची निवड केली आहे तो नीतीने न्याय करणारा आणि शक्तिशाली आहे.—प्रक १९:११, १५, १६.
पुढे होणाऱ्या या घटनांमुळे लोक घाबरतील आणि त्यांचे “हातपाय गळून जातील.” पण यहोवाने त्याच्या लोकांना आधी कसं वाचवलं होतं आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टींबद्दल त्याने आपल्याला जे सांगितलंय त्याबद्दल वाचून आपण त्यावर मनन करू शकतो. असं केल्यामुळे आपल्याला आपलं ‘डोकं वर करून ताठ उभं राहता येईल.’ कारण आपल्या सुटकेची वेळ जवळ आहे याची आपल्याला पूर्ण खातरी असेल.—लूक २१:२६, २८.