व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

विपत्तीनंतर मदत कशी कराल?

विपत्तीनंतर मदत कशी कराल?

आज नैसर्गिक विपत्तींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. जेव्हा एखादी विपत्ती येते तेव्हा मदतकार्य पुरवण्यासाठी सगळ्या गोष्टी सुव्यवस्थेने आणि सुसंघटितपणे कराव्या लागतात. आणि त्यासाठीच नियमन मंडळाने प्रत्येक शाखा कार्यालयात विपत्ती मदतकार्य विभागाची व्यवस्था केली आहे.

जेव्हा एखाद्या भागात विपत्ती येते तेव्हा विपत्ती मदतकार्य विभागातले बांधव लगेच त्या भागातल्या मंडळ्यांच्या वडिलांशी संपर्क साधतात, आणि तिथल्या प्रचारकांना कशी मदत पुरवता येईल याची विचारपूस करतात. जर खूप जास्त नुकसान झालं असेल आणि तिथल्या बांधवांना ती परिस्थिती हाताळता येत नसेल, तर शाखा कार्यालय मदतकार्यात पुढाकार घेण्यासाठी काही अनुभवी बांधवांना तिथे पाठवेल. हे बांधव मग मदतकार्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम करायला प्रचारकांना बोलवतील. किंवा मग, ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी कोणी दान देऊ शकतं का हे पाहतील. ते शक्य नसेल, तर मग ते स्वतः त्या गोष्टींची खरेदी करून गरजू बांधवांना पुरवतील.

मंडळीतले बांधव जेव्हा स्वतःच्या मनानेच काम करण्याऐवजी संघटनेने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात, तेव्हा बरेच फायदे होतात. त्यामुळे गोंधळ होत नाही, दान दिलेले पैसे आणि वस्तू वाया जात नाहीत. शिवाय त्यामुळे दोन व्यक्‍ती एकच काम करत आहेत, असंही होत नाही.

मदतकार्यासाठी एकंदरीत किती पैसा लागेल आणि किती स्वयंसेवकांची गरज पडेल हे शाखा कार्यालयाने नेमलेले बांधव ठरवतील. तसंच, आपलं मदतकार्य व्यवस्थित आणि लवकर पार पाडता यावं म्हणून ते स्थानिक अधिकाऱ्‍यांशी बोलतील. त्यामुळे कोणीही सांगितल्याशिवाय स्वतःहून पैसे गोळा करू नका, विपत्तीच्या ठिकाणी स्वतःहून मदत पाठवू नका किंवा तिथे जाऊ नका.

पण आपलं आपल्या बांधवांवर प्रेम आहे. आणि म्हणूनच एखाद्या ठिकाणी विपत्ती येते तेव्हा लगेच आपल्याला त्यांना मदत करावीशी वाटते. (इब्री १३:१६) मग अशा वेळी आपण काय करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तिथल्या भाऊबहिणींसाठी आणि त्यांना मदत करणाऱ्‍यांसाठी आपण प्रार्थना करू शकतो. शिवाय, जगभरातल्या कार्यासाठी आपण दान देऊ शकतो. या पैशांचा सगळ्यात चांगला वापर कुठे आणि कसा करायचा, हे शाखा कार्यालयं नियमन मंडळाच्या देखरेखीखाली ठरवतात. आणि जर विपत्तीच्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष जाऊन मदत करायची इच्छा असेल, तर आपण डिझाईन/कंस्ट्रक्शन व्हॉलंटियर ॲप्लिकेशन  (DC-५०) हा फॉर्म भरू शकतो.

ब्राझीलमध्ये पूरग्रस्तांना मदतकार्य,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर द्या:

२०२० साली ब्राझीलमध्ये पूर आपल्यानंतर साक्षीदारांनी जे मदतकार्य केलं त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला विशेष वाटली?