ख्रिस्ती जीवन
व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा
शिकवताना दृश्य माध्यमांचा वापर केल्यामुळे पाहणाऱ्याचं लक्ष खिळून राहतं. एवढंच नव्हे तर जे शिकवलं जात आहे ते समजून घेण्यासाठी आणि ते लक्षात ठेवण्यासाठीसुद्धा त्याला मदत होते. काही महत्त्वाचे धडे शिकवताना, आपल्या महान शिक्षकाने, खुद्द यहोवानेसुद्धा दृश्य माध्यमांचा वापर केला होता. (उत्प १५:५; यिर्म १८:१-६) तसंच थोर शिक्षक, येशूनेही त्यांचा वापर केला होता. (मत्त १८:२-६; २२:१९-२१) अशा दृश्य माध्यमाचा एक प्रकार म्हणजे व्हिडिओ. अलीकडच्या काही वर्षांमध्ये व्हिडिओचा वापर खूपच फायदेकारक असल्याचं दिसून आलं आहे. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला शिकवताना तुम्ही व्हिडिओचा चांगल्या प्रकारे वापर करत आहात का?
देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातील धडे शिकवताना आपल्याला मदत व्हावी म्हणून दहा व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. यातील प्रत्येक व्हिडिओचं शीर्षक हे या माहितीपत्रकात ठळक अक्षरांत दिलेल्या एका प्रश्नाशी संबंधित आहे. तसंच jw.org/mr वर या माहितीपत्रकाची जी डिजीटल आवृत्ती आहे, त्यामध्ये काही लिंक देण्यात आल्या आहेत. यामुळे कोणता व्हिडिओ केव्हा दाखवायचा हे कळतं. यासोबतच, आपल्या शिकवण्याच्या साधनांमध्ये अभ्यास घेण्यासाठी आपण वेगवेगळी प्रकाशनं वापरतो. या प्रकाशनांसाठी साहाय्यक ठरतील असे इतर व्हिडिओसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
तुमच्या विद्यार्थ्याला समजायला अवघड जाईल अशा एखाद्या बायबल विषयावर तुम्ही चर्चा करत आहात का? किंवा तुमचा विद्यार्थी एखाद्या विशिष्ट समस्येचा सामना करत आहे का? मग jw.org/mr आणि JW ब्रॉडकास्टिंगवर बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याला फायदेकारक ठरेल असा एखादा व्हिडिओ त्यात आहे का, ते शोधण्याचा प्रयत्न करा. आणि जर एखादा व्हिडिओ मिळाला, तर आपल्या विद्यार्थ्यासोबत तुम्ही तो पाहू शकता आणि त्यावर चर्चा करू शकता.
दर महिन्याला वेगवेगळे नवीन व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर येत असतात. तेव्हा इतरांना शिकवताना मला या व्हिडिओचा वापर कसा करता येईल, यावर विचार करा.