ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—अंध लोकांना साक्ष देणं
हे का महत्त्वाचं: अंध व्यक्तींना सहसा अनोळखी लोकांशी बोलायला संकोच वाटत असतो. त्यामुळे अशा लोकांना साक्ष देण्याचं कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. यहोवाला अशा अंध लोकांची काळजी आहे. (लेवी १९:१४) त्यामुळे अंध लोकांची आध्यात्मिक रीत्या मदत करून आपण यहोवाचं अनुकरण करू शकतो.
हे कसं करावं:
-
अंध लोकांना “शोधून काढा”. (मत्त १०:११) तुम्ही अशा कोणाला ओळखता का, ज्याच्या कुटुंबात अंध व्यक्ती आहे? अंधांसाठी बनवलेली प्रकाशनं ज्यांना घ्यायला आवडतील, अशी एखादी अंधांची शाळा, त्यांच्यासाठी असणारे आश्रम किंवा इतर अशी ठिकाणं तुमच्या भागात आहेत का?
-
आवड दाखवा. मैत्रीपूर्ण स्वभावामुळे आणि मनापासून आवड दाखवल्यामुळे अंध व्यक्तीला तुमच्याशी बोलताना अवघडल्यासारखं वाटणार नाही. सर्वसाधारणपणे आवडीच्या असणाऱ्या एखाद्या विषयावर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करा.
-
आध्यात्मिक मदत पुरवा. ज्यांना नीट दिसत नाही अशा लोकांची मदत करण्यासाठी आपल्या संघटनेने अनेक वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये प्रकाशनं काढली आहेत. त्यांना विचारा की शिकण्यासाठी कोणत्या फॉरमॅटमध्ये प्रकाशनं त्यांना हवी आहेत. अंध व्यक्तीला ज्या फॉरमॅटमध्ये प्रकाशनं हवी आहेत, त्याच फॉरमॅटमध्ये साहित्याची देखरेख करणाऱ्या बांधवाने ती मागवली आहेत की नाहीत, याची खात्री सेवा पर्यवेक्षकांनी करून घेतली पाहिजे.