ख्रिस्ती जीवन
ताडन—यहोवाच्या प्रेमाचा एक पुरावा
सहसा एखाद्याला प्रशिक्षण देताना ताडन द्यायची किंवा शिस्त लावायची गरज असते. पण कधीकधी एखाद्याची चूक सुधारण्यासाठी किंवा त्याला ताळ्यावर आणण्यासाठीसुद्धा ताडन देणं गरजेचं असतं. यहोवासुद्धा आपल्याला त्याच्या स्तरांनुसार जगता यावं, म्हणून कधीकधी ताडन देऊन सुधारतो. (रोम १२:१; इब्री १२:१०, ११) ताडन मिळतं तेव्हा वाईट वाटणं साहजिक आहे, पण जेव्हा आपण ते स्वीकारतो तेव्हा आपण यहोवाच्या नजरेत नीतिमान ठरतो आणि आपल्याला आशीर्वाद मिळतात. (नीत १०:७) पण ताडन देणाऱ्यांनी आणि ताडन स्वीकारणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
ताडण देणारे. यहोवा ताडन देताना आपल्याशी प्रेमाने वागतो. वडीलांनी, पालकांनी आणि इतर जणांनी ताडन देताना यहोवासारखं प्रेमाने वागलं पाहिजे. (यिर्म ४६:२८) कडक शब्दात ताडन द्यायची गरज पडते, तेव्हाही त्यांनी ते प्रेमाने दिलं पाहिजे आणि योग्य प्रमाणात दिलं पाहिजे.—तीत १:१३.
ताडण स्विकारणारे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं ताडन मिळालं तरी आपण ते स्वीकारलं पाहिजे आणि लगेचच त्यावर काम केलं पाहिजे. (नीत ३:११, १२) आपल्या हातून नेहमीच चुका होत असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सुधारलं जाऊ शकतं. आपण बायबलमध्ये जे वाचतो किंवा सभांमध्ये जे ऐकतो त्यामुळे आपल्याला कोणते बदल करायची गरज आहे ते जाणवतं. कधी-कधी आपल्याला न्यायिक समितीकडूनही ताडन मिळू शकतं. ताडन स्वीकारल्यामुळे आज आपण जीवनात आनंदी राहू आणि भविष्यातही आपल्याला कायमचं जीवन मिळेल.—नीत १०:१७.
“यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो” हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
-
सुरुवातीला कॅनन यांचं जीवन कसं होतं, पण नंतर काय झालं?
-
यहोवाने त्यांना प्रेमळपणे कसं ताडन दिलं?
-
त्यांच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?