व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

mustafahacalaki/DigitalVision Vectors via Getty Images

जागे राहा!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स—शाप की वरदान?—बायबल काय म्हणतं?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स—शाप की वरदान?—बायबल काय म्हणतं?

 अलीकडेच जगातल्या नेत्यांनी, शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबरदस्त क्षमतेबद्दल आपली मतं मांडली आहेत. याचे बरेच फायदे आहेत हे त्यांनी मान्य केलं असलं, तरी त्याचा किती गैरवापर होऊ शकतो याबद्दलही त्यांना काळजी वाटत आहे.

  •   “आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जगात वापरल्या जाणाऱ्‍या सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे. त्यामुळे लोकांचं जीवन आणखी सोयीस्कर होऊ शकतं. . . . पण यासोबतच, या तंत्रज्ञानामुळे लोकांची सुरक्षा, त्यांचे नागरी हक्क आणि गोपनीयता धोक्यात येऊ शकते. तसंच लोकशाहीवरचा त्यांचा भरवसाही कमी होऊ शकतो.”—कमला हॅरीस, अमेरिकेच्या उपाध्यक्षा, ४ मे २०२३.

  •   “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होईल असं जरी वाटत असलं, तरी त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो,” असं आंतरराष्ट्रीय डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या गटाचं नेतृत्व करणारे डॉ. फ्रेड्रीक फेडरस्पियल यांनी बी.एम.जे ग्लोबल हेल्थ यात ९ मे २०२३ ला प्रकाशित झालेल्या एका लेखात लिहिलं. a

  •   “खोटी माहिती पसरवण्यासाठी लोक AI चा सहज वापर करू शकतात. त्यामुळे लवकरच लोकांच्या हातात नोकऱ्‍या राहणार नाहीत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्‍या काहींना असं वाटतं की AI मुळे पुढे मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो.”—द न्यू यॉर्क टाईम्स, १ मे २०२३.

 AI चा वापर चांगल्यासाठी होईल की वाइटासाठी हे पुढे येणारा काळच सांगेल. पण बायबल याबद्दल काय म्हणतं?

माणसांचे प्रयत्न भरवशालायक का नाहीत?

 माणसांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठीच होईल याची खातरी ते का देऊ शकत नाहीत हे बायबल सांगतं.

  1.  १. लोकांचे हेतू जरी चांगले असले तरी पुढे जाऊन आपल्या कामाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे ते आधीच सांगू शकत नाहीत.

    •   “माणसाला एक मार्ग योग्य वाटतो, पण तो मार्ग शेवटी मृत्यूकडे नेतो.”—नीतिवचनं १४:१२.

  2.  २. एखाद्या व्यक्‍तीने केलेल्या कामाचा इतर जण चांगला वापर करतील की नाही यावर त्या व्यक्‍तीचं नियंत्रण नसतं.

    •   ‘माझ्यानंतर येणाऱ्‍या माणसासाठी मला [माझं काम] सोडून जावं लागणार आहे. कोण जाणे तो बुद्धिमान असेल की मूर्ख? तरीही, सूर्याखाली ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मी इतकी बुद्धी आणि शक्‍ती खर्च केली, त्यांचा तो ताबा घेईल.’—उपदेशक २:१८, १९.

 माणसाच्या कामाचे परिणाम सहसा अनिश्‍चित असल्यामुळेच आपल्याला निर्माणकर्त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

कोणावर भरवसा ठेवायचा?

 आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला वचन दिलंय, की तो माणसांना किंवा माणसांनी बनवलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानाला पृथ्वीचा आणि मानवजातीचा कधीच नाश करू देणार नाही.

  •   “पृथ्वी मात्र सर्वकाळ राहते.”—उपदेशक १:४.

  •   “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”—स्तोत्र ३७:२९.

 आपल्याला शांतिपूर्ण आणि सुरक्षित भविष्य कसं मिळवता येईल याबद्दल आपला निर्माणकर्ता आपल्याला बायबलमधून मार्गदर्शन देतो. याविषयी बायबल काय म्हणतं हे जाणून घेण्यासाठी “एका चांगल्या भविष्यासाठी भरवशालायक मार्गदर्शन कुठे मिळेल?” आणि “आनेवाला कल सुनहरा होगा!” हे लेख पाहा.

a फ्रेड्रीक फेडरस्पियल, रूथ मिशेल, आशा आशोकन, कारलॉस उमाना आणि डेव्हिड मॅककॉय यांनी लिहिलेल्या “थ्रेट्‌स बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू ह्‍युमन हेल्थ ॲन्ड ह्‍युमन एग्जिस्टन्स” या लेखातून.