जागे राहा!
पृथ्वीचा नाश केला जातोय—बायबल काय म्हणतं?
“आज आपण हवामान बदलाच्या जागतिक संकटाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. पाण्याखाली गेलेली महानगरं, कधी पाहिल्या नव्हत्या अशा उष्णतेच्या भयंकर लाटा, विध्वंसक चक्रीवादळं, अनेक ठिकाणी पाणीटंचाई, प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती लुप्त. या फक्त काल्पनिक किंवा वाढवून-चढवून सांगितलेल्या गोष्टी नाहीत. तर वैज्ञानिक सांगतात, की सध्याच्या उर्जाविषयक धोरणांमुळे या गोष्टी लवकरच घडताना दिसतील.”—४ एप्रिल, २०२२ ला जागतिक हवामान बदलाविषयी एका आंतरराष्ट्रीय समितीने दिलेल्या अहवालावर बोलताना, संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव ॲन्टोनियो ग्युटारेश.
“वैज्ञानिक असा इशारा देत आहेत, की येणाऱ्या वर्षांमध्ये हवामान बदलांमुळे होणाऱ्या विनाशकारी परिणामांचा फटका [अमेरिकेतल्या] सगळ्याच म्हणजे जवळपास ४२३ राष्ट्रीय उद्यानांना बसेल. वणवे, महापूर, ध्रुवांवरचा बर्फ वितळणं, समुद्राच्या पातळीत वाढ, उष्णतेच्या लाटा अशा भयंकर संकटांचा इशारा वैज्ञानिक देत आहेत.”—१५ जून, २०२२, द न्यूयॉर्क टाइम्स यातल्या एका लेखातून.
पृथ्वीच्या पर्यावरणाच्या या समस्या खरंच कधी सोडवता येतील का? येत असतील तर त्या कोण सोडवेल? बायबल याबद्दल काय म्हणतं, याकडे लक्ष द्या.
पर्यावरणाच्या नुकसानाबद्दल आधीच भाकीत
बायबलमध्ये सांगितलंय की देव “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश” करेल. (प्रकटीकरण ११:१८) बायबलच्या या वचनातून आपल्याला तीन गोष्टी समजतात:
१. मानवांच्या चुकांमुळे पृथ्वीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.
२. पृथ्वीचं होणारं नुकसान थांबवलं जाईल.
३. मानव नाहीत, तर देव स्वतः पृथ्वीच्या पर्यावरणाच्या समस्या कायमच्या सोडवेल.
पृथ्वी ग्रहाचं भविष्य सुरक्षित
बायबलमध्ये म्हटलंय, की ‘पृथ्वी सर्वकाळ राहते.’ (उपदेशक १:४) तिच्यावर कायम मानवांची वस्ती असेल.
“नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.—स्तोत्र ३७:२९.
पृथ्वीचं झालेलं नुकसान पूर्णपणे भरून काढलं जाईल.
“ओसाड प्रदेश आणि कोरडी भूमी आनंदित होईल, वाळवंट हर्ष करेल आणि केशराच्या फुलांसारखा फुलेल.”—यशया ३५:१.