जागे राहा!
भीषण दुष्काळ—बायबल काय म्हणतं?
“चीनमध्ये सलग तिसरा कडक उन्हाळा आणि तीव्र उष्णतेची लाट नोंदवली गेली.”—द गार्डियन, ७ सप्टेंबर २०२२.
“आफ्रिकेच्या काही देशांमध्ये सलग पाचव्या वर्षी दुष्काळाचं भयंकर स्वरूप दिसेल.”—यू-एन न्यूज, २६ ऑगस्ट २०२२.
“अर्ध्यापेक्षा जास्त युरोप दुष्काळाच्या विळख्यात अडकण्याचा धोका! हा मागच्या ५०० वर्षांतला सगळ्यात मोठा दुष्काळ असावा.”—बीबीसी बातम्या, २३ ऑगस्ट २०२२.
अनेक तज्ज्ञ असं सांगतात, की असे दुष्काळ वाढतच जातील आणि आणखी तीव्र होतील. मग, आपल्या भविष्यासाठी कोणतीही चांगली आशा नाहीए का? बायबल काय म्हणतं?
दुष्काळ आणि बायबलच्या भविष्यवाण्या
बायबलमध्ये आपल्या दिवसांबद्दल असं सांगितलं होतं:
‘ठिकठिकाणी दुष्काळ पडतील.’—लूक २१:११.
दुष्काळामुळे सहसा अन्नटंचाई निर्माण होते. अन्नधान्याच्या कमतरतेमुळे अनेकांचे खाण्या-पिण्याचे हाल होतात. इतकंच काय तर अनेकांचा जीवही जातो. या गोष्टी दाखवून देतात की बायबलची भविष्यवाणी पूर्ण होत आहे.—प्रकटीकरण ६:६, ८.
दुष्काळ दिवसेंदिवस इतके भयानक का होत आहेत?
बायबलमध्ये याचं मूळ कारण सांगितलंय. तिथे म्हटलंय:
“[मनुष्याला] तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.”—यिर्मया १०:२३.
याचा अर्थ माणसं स्वतःवर चांगल्याप्रकारे शासन करू शकत नाहीत. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे सहसा पाणीटंचाई आणि दुष्काळ पाहायला मिळतो.
बरेच वैज्ञानिक हे मान्य करतात की माणसांमुळेच जगभरातल्या तापमानात वाढ झाली आहे. आणि यामुळेच जगभरात दुष्काळ वाढत चाललाय.
दूरचा विचार न करता काही धोरणं राबवल्यामुळे आणि काही स्वार्थी लोकांमुळे जंगलं कमी होत चाललीएत, प्रदूषणात वाढ होतीए, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर होतोय. यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नाहीसे होत आहेत.
पण बायबल आपल्याला एक चांगली आशा देतं.
भविष्यासाठी कोणती चांगली आशा आहे?
बायबल असं सांगतं की देव पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवेल. ते कसं?
१. देव “पृथ्वीचा नाश करणाऱ्यांचा नाश” करेल. (प्रकटीकरण ११:१८) तो दुष्ट आणि पर्यावरणाची नासधूस करणाऱ्या स्वार्थी लोकांचा नाश करेल. आणि अशा प्रकारे तो या समस्येचं एक मूळ कारण नाहीसं करेल.—२ तीमथ्य ३:१, २.
२. “तापलेली, रखरखीत जमीन पाण्याचा तलाव होईल.” (यशया ३५:१, ६, ७) दुष्काळामुळे पृथ्वीची झालेली हानी देव भरून काढेल आणि पृथ्वीला एका सुंदर बागेसारखी बनवेल, जिथे पाण्याची कमतरता नसेल.
३. “तू पृथ्वीची काळजी घेतोस, तिला सुपीक आणि फलदायी करतोस.” (स्तोत्र ६५:९) देवाच्या आशीर्वादाने या पृथ्वीवर सर्वांसाठी भरपूर अन्नधान्य आणि स्वच्छ पाणी असेल.