जागे राहा!
लोक एकमेकांचा इतका द्वेष का करतात?—बायबल काय म्हणतं?
आजकाल बातम्यांमध्ये फक्त द्वेषपूर्ण भाषणं (हेट स्पीच), द्वेषामुळे होणारी हिंसा आणि गुन्हे (हेट क्राइम), तसंच जातीय वादामुळे होणारी हिंसा आणि युद्ध यांबद्दलच पाहायला मिळतं.
“इस्त्रायल आणि गाझामध्ये होणाऱ्या युध्दामुळे आणि कट्टरवादी लोकांनी भडकवल्यामुळे सोशल मीडियावर द्वेषपूर्ण विधानांचं प्रमाण खूप वाढलंय”—द न्यू यॉर्क टाईम्स, १५ नोव्हेंबर २०२३.
“७ ऑक्टोबरपासून संपूर्ण जगात अचानक द्वेषपूर्ण भाषणांचं आणि द्वेषामुळे होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण कधी नव्हे इतकं वाढलंय. ही एक गंभीर आणि काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.”—डेनिस फ्रांसिस, संयुक्त राष्ट्राच्या महासभेचे अध्यक्ष, ३ नोव्हेंबर, २०२३.
द्वेषपूर्ण विधानं, हिंसा आणि युद्ध या गोष्टी काही नवीन नाहीत. आधीच्या काळातसुद्धा लोक ‘क्रूर शब्दांच्या बाणांनी’ एकमेकांवर हल्ला करायचे. तसंच ते हिंसा आणि युद्धसुद्धा करायचे, असं बायबलमध्ये म्हटलंय. (स्तोत्र ६४:३; १२०:७; १४०:१) त्यात हेसुद्धा सांगितलंय, की आज पाहायला मिळणारं द्वेषपूर्ण वातावरण एका खास गोष्टीकडे इशारा करतं.
द्वेष—शेवटल्या दिवसांचं एक चिन्हं
आज लोक एकमेकांचा एवढा द्वेष का करतात याची दोन कारणं बायबलमध्ये सांगितली आहेत.
१. त्यात म्हटलंय शेवटच्या दिवसांत “पुष्कळांचं प्रेम थंड होईल.” (मत्तय २४:१२) आज आपणही अशाच काळात जगतोय. द्वेषाला खतपाणी मिळेल अशाप्रकारे लोकांचं वागणं-बोलणं आणि मनोवृत्ती आहे.—२ तीमथ्य ३:१-५.
२. सैतानाचा जगावर वाईट प्रभाव आहे, म्हणून आपल्याला जगात इतका द्वेष पाहायला मिळतो. बायबल म्हणतं, “सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”—१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९, १२.
तसंच बायबलमध्ये असंही सांगितलंय, की देव द्वेषाला मुळापासून काढून टाकेल. आणि द्वेषामुळे सहन करावं लागत असलेलं दुःख तो कायमचं नाहीसं करेल. बायबल असंही अभिवचन देतं:
देव “त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. यापुढे कोणीही मरणार नाही, कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही. कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:४.